सामाजिक क्षेत्रात काम करताना आपण अनेकदा ‘निवाऱ्याची सोय’ आणि ‘शिक्षण’ यावर भर देतो. परंतु, ज्या मुलांनी आपले कुटुंब गमावले आहे किंवा जे अत्यंत खडतर परिस्थितीतून आले आहेत, त्यांच्यासाठी केवळ छप्पर आणि पुस्तकं पुरेशी नसतात. त्यांना गरज असते ती एका ‘घराची’ आणि ‘मायेच्या स्पर्शाची’. नुकत्याच केलेल्या एका इम्पॅक्ट असेसमेंट व्हिजिट दरम्यान, एका विशेष ‘कौटुंबिक प्रतिरुपाचा’ (Family-based Care Model) अनुभव आला, जो खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचा पाया रचत आहे.
संस्था नव्हे, हे एक ‘घर’ आहे
साधारणपणे अनाथालयांचे चित्र डोळ्यासमोर आले की मोठमोठे हॉल आणि शिस्तीत राहणारी मुलं दिसतात. परंतु, या विशिष्ट उपक्रमात ‘सदन’ (House) ही संकल्पना राबवली जाते. एका घरात १०-१२ मुलांचा गट एका ‘सदन माते’सोबत राहतो. इथे मुलं केवळ लाभार्थी नसून, ते एकमेकांचे भाऊ-बहीण म्हणून वाढतात.
या मॉडेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलांच्या मनात निर्माण होणारी ‘भावनिक सुरक्षितता’. जेव्हा एखादे मूल रात्री घाबरून उठते किंवा शाळेत काही यश मिळवते, तेव्हा त्याचे कौतुक करायला किंवा त्याला जवळ घ्यायला तिथे एक ‘आई’ असते. ही कौटुंबिक मुलांच्या आत्मविश्वासाचा मुख्य स्त्रोत ठरते.
परिवर्तनाचा कणा: ‘सदन माता’
या संपूर्ण प्रवासात ‘सदन माता’ हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. या केवळ कर्मचारी नसून त्या मुलांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिल्पकार आहेत. काही वर्षांचा अनुभव असलेल्या या माता मुलांच्या केवळ खाण्यापिण्याचीच नाही, तर त्यांच्या सर्वांगीण वाढीची जबाबदारी घेतात.
मुलांच्या अभ्यासाचा अहवाल ठेवणे, त्यांच्या आरोग्याची, वैयक्तिक स्वच्छता काळजी घेणे आणि त्यांच्यातील बदलांचे निरीक्षण करणे हे त्यांचे रोजचे काम. काही मातांनी स्वतः नोकरीत असताना आपले शिक्षण पूर्ण केले आहे, ज्यामुळे त्या मुलांसाठी एक उत्तम ‘रोल मॉडेल’ ठरत आहेत. किशोरवयीन मुलांच्या वागणुकीतील बदल आणि मोबाइल-सोशल मीडियाचे आकर्षण यांसारख्या आव्हानांना या माता मोठ्या संयमाने हाताळतात.
शिक्षणापलीकडील प्रगती
केवळ शाळेत जाणे म्हणजे प्रगती नव्हे. या प्रकल्पामध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
कौशल्य विकास: कोडिंग, चित्रकला (कलारंग), आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मुलांचे व्यक्तिमत्व फुलवले जाते.
आरोग्य आणि स्वच्छता: मुलींच्या मासिक पाळी आरोग्याबाबत विशेष जनजागृती केली जाते, ज्यामुळे त्यांचा संकोच दूर होऊन त्या आरोग्याप्रती जागरूक होत आहेत.
मानसशास्त्रीय आधार: गरजेनुसार समुपदेशकाची मदत घेतली जाते, ज्यामुळे मुलांच्या मनातील जुन्या जखमा भरून येण्यास मदत होते.
यशाच्या पाऊलखुणा (Impact of Transformation)
या मॉडेलचे यश मुलांच्या बदललेल्या दृष्टिकोनातून दिसून येते. एक उदाहरण म्हणजे एका अशा मुलाचे, जो घरच्या विस्कळीत परिस्थितीमुळे शिक्षणात मागे होता आणि आत्मविश्वास गमावून बसला होता. पण या ‘कौटुंबिक वातावरणात’ आल्यानंतर, शिक्षकांच्या आणि आईच्या मार्गदर्शनाखाली तो आज वर्गात पहिला येत आहे. ही केवळ शैक्षणिक प्रगती नसून त्याच्या ढासळलेल्या आत्मविश्वासाचे पुनरुज्जीवन आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही मुलं जेव्हा बाहेरच्या जगात पाऊल ठेवतात, तेव्हा ती केवळ एक सुशिक्षित व्यक्ती नसून एक स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडतात.
निष्कर्ष: भविष्यातील सामाजिक गुंतवणूक
CSR च्या माध्यमातून जेव्हा आपण अशा प्रकल्पांना पाठबळ देतो, तेव्हा आपण केवळ एका मुलाला मदत करत नसून एका पिढीला मुख्य प्रवाहात आणत असतो. ‘कौटुंबिक प्रतिरूप’ (Family-based Model) हे सिद्ध करते की, योग्य वातावरण आणि मायेचा आधार मिळाल्यास कोणतीही प्रतिकूल परिस्थिती मुलांच्या स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही.
सामाजिक बदल हा एका मुलाच्या चेहऱ्यावरच्या आत्मविश्वासात आणि सदन मातेच्या डोळ्यांतील समाधानात दडलेला असतो.
The article is written by Mr. Varun Phansekar – CSR Associate