कॉक्लियर इम्प्लांट: केवळ एक शस्त्रक्रिया नव्हे, तर एका ‘संपूर्ण प्रवासाची’ सुरुवात
March 4, 2026
कॉक्लियर इम्प्लांट: केवळ एक शस्त्रक्रिया नव्हे, तर एका 'संपूर्ण प्रवासाची' सुरुवात - CSR
वैद्यकीय तंत्रज्ञानाने आज इतकी प्रगती केली आहे की, जन्मतः ऐकू न येणारी मुलेही आता आवाजाच्या जगात प्रवेश करू शकतात. ‘कॉक्लियर इम्प्लांट’ (CI) ही या तंत्रज्ञानाची एक मोठी देणगी आहे. नुकत्याच केलेल्या एका सखोल अभ्यासादरम्यान, अनेक डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि लाभार्थी कुटुंबांशी संवाद साधला. या अभ्यासातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे – ही शस्त्रक्रिया म्हणजे यशाचे शेवटचे टोक नसून, एका मोठ्या संघर्षाची ही केवळ सुरुवात आहे.
शस्त्रक्रिया करून ७ लाखांहून अधिक किमतीचे मशीन बसवणे हे या प्रक्रियेतील पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. परंतु, खरी लढाई शस्त्रक्रियेनंतर सुरू होते. डॉक्टरांच्या मते, शस्त्रक्रियेनंतरचे ‘पुनर्वसन’ (Rehabilitation) हीच या संपूर्ण प्रक्रियेची जीवनरेषा आहे.
इम्प्लांट बसवल्यानंतर मुलाला आवाज ऐकू येऊ लागतात, पण त्या आवाजाचा अर्थ लावणे मेंदूला शिकावे लागते. यासाठी ‘स्पीच थेरपी’ आणि ‘ऑडीटरी वर्बल थेरपी’ (AVT) अत्यंत आवश्यक आहे. जर हे पुनर्वसन नियमित आणि दीर्घकाळ झाले नाही, तर लाखो रुपयांचा खर्च आणि शस्त्रक्रिया निष्फळ ठरू शकते. थेरपीमुळेच मूल बोलायला शिकते आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येते.
आर्थिक अडथळे आणि पालकांची ओढाताण
अभ्यासादरम्यान ग्रामीण आणि उपनगरीय भागातील कुटुंबांच्या काही गंभीर समस्या प्रकर्षाने जाणवल्या:
१. प्रतीक्षा यादी आणि खर्च: अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. ७ लाखांचा खर्च गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असतो.
२. गुणवत्तेशी तडजोड: तज्ज्ञ सहसा दोन्ही कानांचे (Bilateral) इम्प्लांट सुचवतात, जेणेकरून मुलाला आवाजाची दिशा समजावी. मात्र, आर्थिक टंचाईमुळे अनेक पालकांना जड अंतःकरणाने केवळ एकाच कानाचा इम्प्लांट स्वीकारावा लागतो.
३. देखभाल आणि शाश्वतता: काही कुटुंबे दरमहा ३ ते ४ हजार रुपये थेरपीसाठी खर्च करू शकतात, काही कुटुंबे ते सुधा करू शकत नाही तसेच मशीनची देखभाल, पार्ट बदलणे किंवा बॅटरीचा खर्च यांसारख्या आकस्मिक मोठ्या खर्चासाठी त्यांना संस्थात्मक मदतीची नितांत गरज असते.
गुंतवणूक उपकरणात नव्हे, तर भविष्यात!
CSR च्या माध्यमातून जेव्हा आपण कॉक्लियर इम्प्लांट प्रकल्पाला पाठबळ देतो, तेव्हा आपण केवळ एका उपकरणाचा खर्च उचलत नाही, तर एका मुलाला कायमचे ‘मूक-बधिर’ होण्यापासून वाचवत असतो.
ही गुंतवणूक तेव्हाच यशस्वी ठरते जेव्हा ती केवळ ‘शस्त्रक्रियेपुरती’ मर्यादित न राहता ‘पुनर्वसना’पर्यंत पोहोचते. आपल्याला अशा मॉडेलची गरज आहे जेथे शस्त्रक्रियेसोबतच, पुढील २-३ वर्षांची थेरपी आणि मशीनच्या देखभालीची खात्री दिली जाईल.
निष्कर्ष
प्रत्येक मुलाला ऐकण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. कॉक्लियर इम्प्लांटमुळे ही मुले सामान्य शाळेत जाऊ शकतात, स्वावलंबी बनू शकतात आणि देशाचे जबाबदार नागरिक होऊ शकतात. आपल्या सहकार्याने आपण या मुलांच्या आयुष्यातील ‘शांतता’ संपवून त्यांना ‘संवादाचे’ नवीन जग देऊ शकतो.
या प्रकल्पाचा उद्देश केवळ मशीन बसवणे नाही, तर त्या मुलाला बोलताना पाहणे हा आहे.
The article is written by Mr. Varun Phansekar – CSR Associate